सुरजागड लोहखाण अपघातातील जखमी मजुरांना हलविले चंद्रपूरला

तीनही मृतांच्या कुटुंबांना मिळणार आर्थिक मदत

उंचावरून खाली पडलेल्या वाहनाखाली दबलेली बोलेरो जीप

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या सुरजागड लोहखाणीतून कच्चा माल काढताना एक वाहन उंचावरून खाली कोसळून बोलेरो वाहनावर आदळून झालेल्या अपघातात बोलेरोमधील तरुण अभियंत्यासह दोन मजुरांना जीव गमवावा लागला. या अपघातात आणखी दोघे जण जखमी असून त्यांना अहेरीतील उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी झालेल्या या दुर्दैवी अपघातात नागेपल्ली येथील सोनल रामगिरवार या तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वर्षभरापूर्वी लग्न झाल्याने रामगिरवार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि पत्नी असे सदस्य आहेत. या अपघातातील दोन मजूर हरियाणा राज्यातील असून शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह मूळ गावी रवाना केल्याचे सांगितले जाते.

दरम्यान लोहदगडांचे खणन करणाऱ्या लॅायड्स मेटल्सकडून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. मात्र किती मदत दिली जाणार आहे याबाबत कंपनीकडून संध्याकाळपर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.