देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणारी हल्लेखोर वाघिण टी-14 जेरबंद

बेशुद्ध करून आणले, पहा व्हिडीओ

गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या टी-14 या वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या वाघिणीने 11 सप्टेंबर रोजी एका महिलेचा बळी घेतला होता.

देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यात अनेक दिवसांपासून वावरणाऱ्या आणि धुमाकूळ घालणाऱ्या टी-2 या वाघिणीच्या पाच बछड्यांपैकी टी-14 ही एक वाघिण आहे. ती आता मोठी झाली असून काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आईपासून वेगळी होऊन स्वतंत्रपणे शिकार करू लागली होती.

११ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्यातील फरी (झरी) गावाजवळच्या शेतशिवारात निंदण करत असलेल्या महिलेवर सदर वाघिणीने हल्ला करून तिला ठार केले होते. याशिवाय जंगलालगतच्या गावातील रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव विभागाने त्या वाघिणीला जेरबंद करण्याची परवानगी दिली होती.

वनविभागाच्या चमूने रविवारी सकाळी 6.45 वाजताच्या सुमारास देसाईगंज वनपरिक्षेत्रातील शिवराजपूर कक्षात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॅा.रविकांत खोब्रागडे, तसेच शुटर अजय मराठे, यांनी बेशुद्धीचे इंजेक्शन (डार्ट) देऊन या वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर पिंजराबंद करून गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलविण्यात आल्याची माहिती देसाईगंजचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.