खासदार नेते यांच्या नेतृत्वातील निर्मलमध्ये तीनपैकी दोन जागी भाजपला विजय

तिसऱ्या उमेदवाराचा थोडक्यात पराभव

गडचिरोली : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र पक्षाच्या जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात लढवल्या गेलेल्या तीन पैकी दोन मतदार संघात भाजपला यश मिळाले आहे. भाजपने तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असलेल्या तीन मतदार संघांचे प्रभारी म्हणून खा.नेते यांच्यावर जबाबदारी सोपविली होती.

निर्मल जिल्हातील निर्मल, मुधोल आणि खानापूर या तीन विधानसभा क्षेत्राची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळण्यासाठी खा.नेते काही दिवसांपासून तेलंगणात तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी प्रचाराची रणनिती ठरवत त्यांना कामी लावले होते. त्याचा परिणाम म्हणून निर्मल विधानसभा क्षेत्रातून भाजपचे माहेश्वर रेड्डी, तसेच मुधोल विधानसभा मतदार संघातून रामाराव पटेल हे दोन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. खानापूर विधानसभेत भाजपच्या उमेदवाराला निसटता पराभव स्वीकारावा लागला.

तीनपैकी दोन जागी पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळाल्याचे समाधान आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन, पण पराभूत उमेदवारांनी खचून न जाता पक्षाचे काम सतत करत राहावे. पक्ष बळकटीकरणासाठी माझे नेहमीच सर्वांना सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया खा.नेते यांनी व्यक्त केली.

विजय सक्षम नेतृत्वाचा, भाजपाच्या कार्यकर्तृत्वाचा !

तेलंगणातील निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांच्या गराड्यात खा.अशोक नेते

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल खा.नेते यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचे अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर सर्वसामान्यांचा असलेला विश्वास, तसेच गृह व सहकारमंत्री अमित शाह यांचे परिश्रम व मार्गदर्शनामुळे मध्यप्रदेशमधील सत्ता शाबूत ठेवण्यासोबत राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आपले वर्चस्व स्थापित करण्यात भाजपला यश आले, अशी प्रतिक्रिया खा.अशोक नेते यांनी व्यक्त केली.