भरधाव बाईक ट्रकवर धडकली, गोविंदगावचे तीन तरुण ठार

मुरखड्याजवळ समोरासमोर ठोकले

गडचिरोली : नवीन घेतलेल्या बाईकवरून भरधाव वेगाने ट्रिपल सिट जाणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले. समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकल्याने गंभीर जखमी होऊन तिघांचाही मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील मुरखळा फाट्याजवळ मुख्य मार्गावर घडला. हे तीनही तरुण अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथील रहिवासी होते.

अक्षय दशरथ पेंदाम (२३ वर्ष), अजित रघु सडमेक (२३) आणि अमोल अशोक अर्का (२०) अशी त्या मृत युवकांची नावे आहेत. हे तरुण एका दुकाचीवरून चंद्रपूर मार्गावरून गडचिरोलीच्या दिशेने येत होते. याचवेळी गोंदियाकडून आंध्र प्रदेशात जाणारा ट्रक गडचिरोलीकडून चंद्रपूरच्या दिशेने निघाला होता. बाईक चालवणाऱ्या अक्षय पेंदाम याचे नियंत्रण सुटले आणि त्यांची बाईक समोरून येणाऱ्या त्या ट्रकला धडकली. यामुळे बाईक काही अंतरावर पुढे जाऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडली. तिघेही तरुण रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचे शवपरिक्षण केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.