आरमोरी : स्वभावाने शांत, प्रेमळ असणाऱ्या एका युवकाने आपल्या घरात दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या करण्याच्या घटनेने आरमोरीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मयूर तुकाराम सोनकुसरे (29 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तहसील कार्यालयाजवळच्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहासमोरील परिसरात सोनकुसरे यांचे घर आहे. मयुरला आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहिण असा हा परिवार आहे. आर्थिक परिस्थिती साधारण असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. दरम्यान रविवारी सायंकाळी मयूर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब लक्षात येताच कुटुंबिय आणि शेजाऱ्यांनी धाव घेतली, पण तोपर्यंत मयूरचा मृत्यू झाला होता.
सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या आणि स्वभावाने शांत असणाऱ्या मयुरने असे का केले, याचे आश्चर्य स्थानिकांना वाटत आहे. आरमोरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
































