जमिनीशी नाते जपणारा आदर्श नेता डॅा.अशोक नेते

वाढदिवसानिमित्त विशेष लेख

“जनसेवा हीच ईश्वरसेवा”, हे तत्व मनापासून मानणारे, सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरू करून लोकसभेपर्यंत पोहोचलेले आणि अजूनही जमिनीशी आपुलकीचे नाते जपणारे आदर्श नेतृत्व म्हणजे डॉ.अशोक नेते ! भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि दोन वेळा आमदार या नात्याने त्यांनी विदर्भ आणि विशेषतः गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागाला विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नवी दिशा दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

✦ सामान्य माणसाचा असामान्य प्रवास

1 जुलै 1968 रोजी मौजा बरडपवनी, ता.नरखेड जि.नागपूर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अशोक नेते यांचे बालपण गरिबी, संघर्ष आणि आत्मसन्मान यांच्यात गेले. कुटुंबाचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता, परंतु त्यांच्या मनात लहानपणापासूनच सामाजिक जाणीव आणि समाजहितासाठी काहीतरी करावे ही तीव्र भावना होती.

मोठे बंधू गडचिरोली येथे आरटीओ अधिकारी असताना अशोक नेते त्यांच्यासोबत गडचिरोलीला आले आणि उपजिविकेचे साधन म्हणून एका छोट्याशा खानावळीच्या माध्यमातून आपल्या सेवाभावी प्रवृत्तीची सुरुवात त्यांनी केली. हळूहळू ही खानावळ केवळ उदरनिर्वाहाचे साधन राहिली नाही, तर गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम भागातून येणाऱ्या, अडीअडचणीत असलेल्या माणसासाठी दोन घास हक्काने खाण्याचे ठिकाण झाले होते. त्यावेळी त्याला आस्थेने, आपुलकीने, प्रेमाने, विचारणा व्हायची व त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर केल्या जात होत्या. इथूनच त्यांच्या जनसंपर्काचा पाया रोवल्या गेला.

✦ राजकारणात प्रवेश – कार्यकर्ता ते खासदार प्रवास

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारासोबत जुळून भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष म्हणून अशोक नेते यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. निष्ठा, शिस्त आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी पक्षात लवकरच ओळख निर्माण केली. जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मने जिंकून
1999 मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवून जिंकली आणि पहिल्यांदा आमदार झाले. 2004 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे, अभ्यासू व संयमी स्वभावामुळे आणि लोकहितासाठी लढण्याच्या वृत्तीमुळे त्यांची एक प्रामाणिक व विकासाभिमुख नेते म्हणून ओळख निर्माण झाली.

✦ संसदेत आदिवासींचा ठाम आवाज

2014 साली गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले. खासदार म्हणून 10 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी

✅ 1700 पेक्षा अधिक वेळा संसदेत उपस्थिती लावली.
✅ 272 प्रश्न संसदेत उपस्थित केले.
✅ 377 शून्य प्रहरात विषय मांडले

वरील आकड्यांवरून त्यांच्या कार्यक्षमतेची स्पष्ट साक्ष मिळते. त्यांच्या प्रयत्नातून गडचिरोली-चिमूर सारख्या नक्षलग्रस्त भागात महामार्ग, पूल, सिंचन, मोबाईल नेटवर्क, वीज, बँका, रेल्वे, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी अभूतपूर्व विकासकामे घडली. विशेषतः आदिवासी, महिला, युवक आणि मागासवर्गीय समाजासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवून सशक्तीकरणाचे कार्य केले.

✦ विकास कामांची ठळक उदाहरणे

🔹 1400 कोटींची पायाभूत विकास कामे, त्यात राष्ट्रीय महामार्ग, पूल, चिचडोह, कोटगल बॅरेज या सिंचन योजनांचे विस्तारीकरण.
🔹 रेल्वे प्रकल्प – वडसा-गडचिरोली, गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-सिरोंचा-मंचेरियल मार्गाचे सर्व्हेक्षण व पुढील प्रक्रिया, गडचिरोली ते धानोरा मुरुमगांव-भानुप्रतापपूर (छ.ग.) रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण, काम्पा-टेम्पा, चिमूर, वरोरा या रेल्वेलाईनचे (ब्रॅाडगेज) काम असे विविध प्रकारे रेल्वेच्या विस्ताराचे जाळे पसरविण्याचे काम त्यांच्याच काळात सुरू झाले.
🔹 औद्योगिक प्रकल्प – सुरजागड लोहखाण प्रकल्प, कोनसरी स्टील प्लांटची मुहूर्तमेढ
🔹 शैक्षणिक संस्थांची स्थापना – गोंडवाना विद्यापीठ, सरकारी कृषी व वैद्यकीय महाविद्यालये, एकलव्य निवासी विद्यालय
🔹 आदिवासी युवकांसाठी योजना – स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रे, शिष्यवृत्ती योजना, हवाई पट्टी तयार करण्यासाठी पुढाकार.

राजकारणापेक्षा समाजकारण हेच जीवनकार्य मानणाऱ्या डॉ.अशोक नेते यांच्या सामाजिक बांधिलकीला साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने डॅाक्टर आॅफ सोशल सर्व्हिस अॅन्ड लिडरशिप या उपाधीने सन्मानित केले.

✦ पराभवानंतरही सेवेला समर्पित

राजकीय पराभव आल्यानंतर अनेक जण सक्रिय राजकारणापासून दूर जातात. मात्र अशोक नेते यांनी पराभव हा जनसेवेचा नवा अध्याय मानले. भामरागड, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, कुरखेडा, कोरची, धानोरा यासारख्या अतिदुर्गम भागांमध्ये त्यांनी नियमित भेटी देत लोकांचे प्रश्न ऐकून घेणे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे सुरूच ठेवले. त्यांचे जनसंपर्क कार्यालय आजही खुले असून, अनेक लोकांच्या अडीअडचणी असल्यास त्यांच्याशी सहज संवाद साधता येतो. हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे.

✦ संघटनात्मक नेतृत्व व पक्षवाढ

युवा मोर्चातील कार्यकर्त्यापासून आज भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री होईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात भाजपला पहिल्यांदाच सत्ता मिळाली. लोकसभेसह विधानसभेच्या तीनही जागा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळाल्या होत्या. त्यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने मेहनत घेतली आणि आदिवासी समाजाच्या मनात पक्षाबद्दल विश्वास निर्माण केला.

✦ मान्यतांचा वर्षाव – कार्याची सन्मानपूर्वक नोंद
🏅 “आदर्श सांसद पुरस्कार” – पुणे येथील युवा संसद
🏅 “राष्ट्रीय मानवाधिकार सन्मान”
🏅 “लोकमत लोकनायक पुरस्कार”
🏅 “ डॅाक्टरेट आॅफ सोशल सर्व्हिस अॅन्ड लिडरशिप”

हे पुरस्कार त्यांच्या सेवाभावी, मूल्यनिष्ठ आणि लोककेंद्रित राजकीय जीवनाचे मानचिन्ह आहेत.

✦ एक सुसंस्कृत, आत्मिय आणि खरा लोकनेता

डॉ.अशोक नेते हे आजही संयमी, सुसंस्कृत आणि सामान्य जनतेशी आत्मियतेने वागणारे सतत सक्रिय कार्यकर्ता आहेत. “जनतेचे प्रश्न हेच आपले प्रश्न” हे तत्त्व त्यांनी कृतीतून सर्वांसमोर ठेवले आहे. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” हा त्यांचा जीवनधर्म आहे आणि त्याला त्यांनी यथार्थतेने सिद्धही केले आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनतेच्या आशीर्वादासह यशाच्या अजून उंच शिखरावर पोहोचण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

– दिवाकर रामदास गेडाम
(लेखक हे मा.खा.डॉ.अशोक नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख आहेत)