जनतेला मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अम्ब्रिशराव यांची ग्वाही

रेपनपल्ली येथे कृषी व जनजागरण मेळावा

अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून मी आपल्या जनतेला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली. ते रेपनपल्ली येथील कृषी मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

यावेळी युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवि नेलकुद्री, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार, पोलीस निरीक्षक गोविंद कटिंग, रवी मनोहर, रेपनपल्लीच्या सरपंच लक्ष्मी मडावी, कमलापूरचे उपसरपंच सचिन ओलेटीवार, प्रशांत नामनवार, विनोद जिल्लेवार, ग्रा.पं.सदस्य रजनिता मडावी, तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अम्ब्रिशराव म्हणाले, आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात अहेरी विधानसभेसाठीच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी मोठा निधी खेचून आणला होता. त्यातील अनेक कामे आजही सुरू आहेत. केवळ निवडणुका लागल्या की मोठमोठे आश्वासन देणे आणि नंतर जनतेला वाऱ्यावर सोडणे हे माझ्याकडून कधीच झाले नाही. आज आमदार नसलो तरीही मी जनतेच्या संपर्कात राहून विविध समस्या सोडविण्याचे काम करीत आहे. आरोग्य, शिक्षण यासोबतच कुठल्याही समस्या असल्यास मला थेट संपर्क साधा करा, असेही आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. पोलीस अधिकाऱ्यांनीही उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

रेपनपल्ली उपपोलिस स्टेशनअंतर्गत समाविष्ट गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विविध साहित्य वाटप करण्यात आले. त्यात शेतीची उपकरणे, औषधी फवारणीचे स्प्रे पंप, पावडे, घमेले, खतांच्या बॅग, गरजू महिलांना शिलाई मशीन तर शाळकरी विध्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या कृषी व जनजागरण मेळाव्याला शेकडो नागरिक उपस्थित होते.