नांदेड जिल्ह्यातील युवकाच्या हत्येची घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी

विविध पक्ष व संघटनांनी केला निषेध

गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, हा राग मनात धरून बोढार हवेली (जि.नांदेड ) येथील अक्षय भालेराव या भीमसैनिकाची धर्मांध व जातीयवादी गावगुंडांनी निर्घृण हत्या केली. ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारी आहे, त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत मोव्हमेंट फॉर जस्टीस, गडचिरोलीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यात विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

सदर प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, कुटुंबाला 50 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, कुटुंब व घटनेच्या साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, दोषींवर अॅट्रॉसिटी आणि हत्येचा कट यासह इतर कलमांनुसार गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, आरोपींची सर्व मालमत्ता जप्त करावी, आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना सहआरोपी करावे, गावातील अल्पसंख्यांक बौद्ध समाजाला आत्मसंरक्षणाकरिता शस्र परवाने द्यावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सचिव रामदास जराते, हेमंत डोर्लीकर, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय कोचे, भारतीय बौद्ध महासभेचे तुलाराम राऊत, प्रा.गौतम डांगे, रिपब्लिकन पक्षाचे हंसराज उंदीरवाडे, प्रदीप भैसारे, बुद्धिस्ट सोसायटीच्या प्रवृत्ती वाळके, धम्मराव तानादू, बीआरएसपीचे प्रितेश अंबादे, प्रतीक डांगे, भाकपाचे देवराव चवरे, एसईएमचे देवेंद्र सोनपिपरे उपस्थित होते.

याशिवाय मूव्हमेन्ट फॉर जस्टीसच्या ऍड.भावना लाकडे, धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, डॉ.दिलीप बारसागडे, डॉ.संतोष सुरडकर, सुधीर वालदे, सोनल दमके, हितेंद्र गेडाम, के. डी. भालेराव, नागसेन खोब्रागडे, प्रफुल बांबोळे, प्रमोद गेडाम, शेकापचे अक्षय कोसणकर, अनिल मेश्राम, मोहन मोटघरे, तुषार भडके, दुष्यन्त तुरे, सुरज हमारे, मोरेश्वर रामटेके, शोभा खोब्रागडे, घनश्याम खोब्रागडे, चुडामन उंदीरवाडे, विलास दरडे, डी.के. डोहणे, राहुल बनकर, शेषराव तुरे, एम.पी. खोब्रागडे, खिरेंद्र म्हशाखेत्री, एस.जी. बारसागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.