अरविंद सा.पोरेड्डीवारांच्या योगदानाचा जीवनगौरव पुरस्काराच्या रूपात सन्मान

सर्व क्षेत्रातून होतेय विशेष बहुमानाचे स्वागत

गडचिरोली : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कै.विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना जाहीर झाला आहे. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा हा सन्मान आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत सर्व क्षेत्रातून त्यांच्या या बहुमानाचे स्वागत केले जात आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी नाशिक येथे समारंभपूर्वक त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॅा.भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार मंत्रालयाच्या न्यु ड्राफ्ट पॅालिसीचे चेअरमन तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॅा.भारती पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

अरविंद सावकार यांचे सहकार क्षेत्रासोबत सांस्कृतिक, कला, शेती, शिक्षण आणि साहित्य अशा विविध क्षेत्राच्या विकासात योगदान आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी वेळोवेळी आपले मत मांडण्यासोबत सल्लाही दिला आहे. याशिवाय गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.