खासदार अशोक नेते आणि आमदार डॅा.देवराव होळी यांच्यात दिलजमाई?

सहकुटुंब स्वागत अन् मिळून केला दौरा

गडचिरोली : एकाच पक्षात काम करताना राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारे गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांचे तार पुन्हा जुळू लागल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. डॅा.होळी यांनी खा.नेते यांचे त्यांच्या चामोर्शी येथील निवासस्थानी सहकुटुंब स्वागत करून सत्कारही केला. एवढेच नाही तर मतदार संघात अनेक ठिकाणी दिवसभर एकत्र फिरून महत्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. यातून डॅा.होळी यांनी मी खंबीरपणे तुमच्यासोबत आहे, असा संदेशच दिला आहे. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण बाजुला सारून ‘एकमेका सहाय्य करू…’ म्हणत त्यांच्यात दिलजमाई झाल्याचे बोलले जाते.

वास्तविक डॅा.होळी यांना 2014 मध्ये भाजपची तिकीट मिळवून देण्यात खा.नेते यांची भूमिका महत्वाची होती. पण पुढे कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. यावेळी तर लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगत डॅा.देवराव होळी हे स्पर्धक बनून खा.नेते यांच्यापुढे उभे ठाकले होते. पण महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेसाठी प्रयत्न केल्याने अधिकृत उमेदवारी कोणाला मिळते याबद्दल अनिश्चिततेचे वातावरण होते. अशात हो-नाही म्हणत खा.अशोक नेते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे युतीधर्म पाळत ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी खा.नेते यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. एवढेच नाही तर प्रत्यक्ष उपस्थितीतून तशा संदेशही नागरिकांना दिला. तोच कित्ता गिरवत डॅा.देवराव होळी यांनीही खा.नेते यांच्यासोबत जुळवून घेणे हेच आपल्या राजकीय भवितव्यासाठी फायदेशिर ठरेल, असा बेरजेचा हिशेब जुळविल्याचे दिसून येते. भाजपमध्ये गडचिरोली विधानसभेवर डोळा असलेल्या चार स्पर्धक डॅाक्टरांमुळे तर डॅा.होळी यांच्यात हा बदल झाला नाही ना, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निश्चिंत राहा, माझे पूर्ण सहकार्य

चामोर्शी तालुक्यातील काही भागाचा दौरा करण्यासाठी खा.अशोक नेते आज निघाले असताना सर्वप्रथम त्यांनी आ.डॅा.देवराव होळी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी महायुतीची अधिकृत उमेदवारी मिळाल्याबद्दल डॅा.होळी यांच्या कुटुंबाने खा.नेते यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक साधण्यासाठी त्यांना शुभेच्छा देताना तुम्ही निश्चिंत राहा, माझे पूर्ण सहकार्य तुम्हाला राहील, असेही सांगितल्याचे समजते. यावेळी दोघांनी पक्ष संघटनेबद्दल आणि प्रचारकार्याबद्दल सविस्तर चर्चाही केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, सामाजिक नेते नंदकिशोर काबरा, जिल्हा सचिव दिलीप चलाख, जेष्ठ नेते जयराम चलाख, युवा नेते निखिल धोडरे, रामचंद्र वरवाडे आदी उपस्थित होते.

घोट, गुंडापल्लीचा सोबत दौरा

चामोर्शी येथून खा.अशोक नेते आणि आ.डॅा.होळी यांनी सोबत घोट आणि गुंडापल्लीचा दौरा केला. घोट येथे भाजपचे नामदेवराव सोनटक्के यांच्या दुकानात भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सुभाषग्राम (गुंडापल्ली) येथे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन छोटीखानी बैठका घेतल्या. यावेळी गावातील काही समस्या निकाली काढण्यासाठी संबंधितांना सूचनाही केल्या. या दौऱ्यात त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, नंदकिशोर काबरा, बंगाली समाज आघाडीचे नेते दीपक हलदार, भाजपचे जिल्हा सचिव दिलीप चलाख, निखिल धोडरे, दीपक सातपुते, जयराम चलाख, रामचंद्र वरवाडे, विलास उईके, साईनाथ नेवारे, ऋषी कोडाप, गिरिष उपाध्याय, रूमपा शहा, विशाखा सिंह, माधव घराणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.