Home राजकीय घडामोडी खा.डॅा.किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक, रुग्णालयात भोजन

खा.डॅा.किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना नोटबुक, रुग्णालयात भोजन

राजकीय सौहार्दाच्या वातावरणात शुभेच्छा

विद्यार्थ्यांना नोटबुक वितरणप्रसंगी मार्गदर्शन करताना महेंद्र ब्राह्मणवाडे

खासदार डॅा.किरसान यांना फोनवरून शुभेच्छा देताना माजी खासदार डॅा.नेते

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीसह तालुकास्तरावर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

लोकसभा क्षेत्रातील एक लाखावर शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोलीसह विविध तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हा महिला रुग्णालयात भोजनदानाचा उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश देण्यात आला.

गडचिरोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पीएम श्री जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगर, नगरपरिषद शाळा रामपुरी, सावित्रीबाई फुले शाळा गोकुळनगर तसेच भगवंतराव प्राथमिक व कनिष्ठ विद्यालय, गोकुळनगर येथे विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करण्यात आले. याशिवाय लोकसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण, रक्तदान, रुग्णसेवा, शैक्षणिक साहित्य वितरण, भोजनदान आदी सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले.

गडचिरोली येथील कार्यक्रमात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, नगरसेवक तथा शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावड, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अब्दुल पंजवाणी, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, दिवाकर निसार, माजी नगरसेवक संजय मेश्राम, ढिवरू मेश्राम, नदीम नाथानी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, मोहन वरगंटीवार, जितेंद्र मुनघाटे यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय तसेच विविध विभाग व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा.खा.डॉ.अशोक नेते यांनीही दिल्या शुभेच्छा

खासदार डॅा.नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी मोबाईलवरून डॉ.नामदेव किरसान यांच्याशी संपर्क साधत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भावी राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. राजकारण आपल्या जागी आणि वैयक्तिक स्नेह आपल्या जागी असतो. लोकप्रतिनिधी म्हणून क्षेत्राच्या विकासासाठी काम करत असताना अशा प्रकारच्या सुसंवादातून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या समृद्ध राजकीय संस्कृतीची झलक पहायला मिळाली.