भाजपच्या तीन आमदारांनाही बसू शकतो सरकारविरोधी वातावरणाचा फटका

लोकसभेचा निकाल सावध करणारा

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या सर्वच्या सर्व, म्हणजे सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारत सत्ताधारी भाजपविरोधात कौल दिला. पूर्व विदर्भात उसळलेल्या सरकारविरोधी लाटेने भाजपचे यशाचे स्वप्न वाहून नेले. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र कायम राहिल्यास या लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या तीन विद्यमान आमदारांचे काय होणार? अशा चर्चेला आता सुरूवात झाली आहे.

सलग 10 वर्षांपासून भाजपचे आमदार असलेले गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे डॅा.देवराव होळी, आरमोरीचे कृष्णा गजबे आणि चिमूरचे बंटी भांगडिया यांच्या कार्यक्षेत्रातून भाजपला बहुमत मिळाले नाही. त्यांच्या क्षेत्रातून भाजपला बहुमत मिळवून देण्याची जबाबदारी त्या आमदारांवर असताना काँग्रेसला बहुमत मिळणे ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

गडचिरोली विधानसभेत काँग्रेसचे डॅा.नामदेव किरसान यांना भाजपचे अशोक नेते यांच्यापेक्षा 22,917 मते जास्त आहेत. आरमोरी मतदार संघात 33,421 मते, तर चिमूर मतदार संघात 37,361 मते जास्त आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या अहेरी मतदार संघातही डॅा.किरसान यांना 12,152 मते जास्त आहेत. या ठिकाणी कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह माजी आमदार अम्ब्रिशराव आत्राम यांनीही नेते यांच्यासाठी प्रचार केला केला. राजघराण्यातील या दोन्ही दिग्गजांनी नेते यांच्यासाठी मते मागितल्यानंतरही काँग्रेसला मिळालेले मताधिक्य आश्चर्यात टाकणारे ठरले आहे. ग्रामसभांचा प्रभाव आणि अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन न होता ती मते काँग्रेसच्या पारड्यात पडल्याने काँग्रेसचा विजय सुकर झाल्याचे दिसून येते.

भाजपवासी झालेल्या डॅाक्टरांमुळे फायदा काय?

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे पदाधिकारी असलेले डॅा.नितीन आणि डॅा.चंदा कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी यांनाही भाजपने गळाला लावले. काँग्रेसचे पदाधिकारी आमच्याकडे आल्याचे दाखवून इतरही मतदार संघांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील प्रसार माध्यमांसमोर त्यांचा पक्षप्रवेश घडविला. पण प्रत्यक्षात गडचिरोली लोकसभा मतदार संघावरही त्यांच्या पक्षप्रवेशाचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा विचार भाजप करेल का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.