चामोर्शीत भाजपाचा विजयी जल्लोष, खुल्या वाहनावर काढली मिरवणूक

अशोक नेतेंसह पदाधिकारी सहभागी

चामोर्शी : विधानसभा निवडणुकीत गडचिरोली मतदार संघातून भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांनी मिळवलेल्या विजयाचा आनंद चामोर्शी शहरात जल्लोषात काढलेल्या विजयी मिरवणुकीने साजरा करण्यात आला. या मिरवणुकीत खुल्या वाहनावर डॅा.नरोटे यांच्यासह विजयात महत्वाची भूमिका बजावणारे माजी खासदार अशोक नेते आणि इतर पदाधिकारी विराजमान झाले होते. या मिरवणुकीच्या माध्यमातून चामोर्शीकरांना अभिवादन करत त्यांचे आभार मानण्यात आले.

या रॅलीत भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा मा.खा.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेडी, रमेश बारसागडे, रोशनी वरघंटे, तसेच अनेक भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या रॅलीदरम्यान चामोर्शी शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच मिठाईचे वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. शहरभर उंचावलेल्या भाजपच्या झेंड्यांनी विजयाची अनुभूती आणखी तेजस्वी केली. डॅा.नरोटे यांच्या विजयाने चामोर्शीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.

स्व.स्वप्निल वरघंटे यांना आदरांजली

रॅलीदरम्यान भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व.स्वप्निल वरघंटे यांच्या स्मृतीला उजाळा ‌देत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या विजयात त्यांच्या कार्याचा वाटा असल्याचा उल्लेख कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या स्मृतीचा आदर राखत, त्यांचे पोस्टर विजयी रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले.