रानडुकराच्या हल्ल्यात आणखी एक असहाय महिला गंभीर जखमी, चंद्रपूरला रेफर

तेंदूपत्ता तोडाईतून कुटुंबाला हातभार

अहेरी : तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू असताना रानडुकराच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. पुन्हा एका घटनेत रविवारी वांगेपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या किष्टापूर येथील अनसुया सतीश भोयर ही महिला गंभीर जखमी झाली. पतीच्या निधनानंतर एक मुलगी आणि एका मुलाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अनसुया आपल्या माहेरी व्यंकटरावपेठा, कटरापेठा येथे तेंदूपत्ता तोडाईसाठी आली होती.

अनसुया सकाळी तेंदूपत्ता तोडाईसाठी गेली असताना तिच्यावर रानडुकराने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्याचा सल्ला डॅाक्टरांनी दिला. दरम्यान काँग्रेसचे अहेरी विधानसभा समन्वयक अजय कंकडालवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन जखमी महिलेची विचारपूस केली आणि पुढील उपचारासाठी आर्थिक मदत दिली.

यावेळी नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विनोद रामटेके, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, माजी उपसरपंच राऊत, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.