सिरोंचा : येथील नगर पंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अंतर्गत असंतोष वाढल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या कारभाराविरोधात 17 पैकी 14 नगरसेकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नगर पंचायतीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सिरोंचा नगर पंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नगराध्यक्ष शेख फरजाना शेख इक्तेफार आणि उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या कार्यपद्धतीवर त्यांचेच नगरसेवक नाराज आहेत. विकासकामांमध्ये होत असलेला विलंब, निर्णय प्रक्रियेतील कथित एकतर्फीपणा आणि प्रशासनात पारदर्शकतेचा अभाव, यामुळे अखेर नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
सोमवारी यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनावर आता पुढील कार्यवाही करण्यासाठी लवकरच विशेष बैठक बोलावली जाऊ शकते. या घडामोडींमुळे नागरिकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त करत पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त केली. दुसरीकडे काही जणांनी राजकीय मतभेदांमुळे विकासकामांवर परिणाम होऊ नये, अशी चिंता व्यक्त केली आहे.
































