गडचिरोली : गडचिरोलीवरून एटापल्लीमार्गे अहेरीला जाणाऱ्या अहेरी आगाराच्या बसचा मागील पत्रा एटापल्लीजवळ अचानक निघाला. मुख्य मार्गावरून बस धावत असताना रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडला. पण प्रसंगावधान राखत चालकाने बस थांबवल्याने अनर्थ टळला. हा प्रसंग मंगळवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडला. यावेळी बसमध्ये 25 पेक्षा जास्त प्रवासी होते.
एटापल्ली येथील कसनसूर पाँईटला थांबून बस एटापल्ली बस थांब्याकडे निघाली असताना गोटुलसमोरच्या रहदारीच्या रस्त्यावर बसच्या मागील भागातील प्रवाशांच्या सीटमागील पत्रा निघून रस्त्यावर घासत गेल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे चालकाने लगेच बस थांबवली. बस थांबताच सर्व प्रवासी घाबरून खाली उतरले. बसच्या मागे कोणते वाहन किंवा रस्त्याने पायी जाणारे कोणी नव्हते, अन्यथा हा अपघात एखाद्याच्या जीवावर बेतला असता. थोड्या आधारावर पत्रा बसला चिकटून होता. तो बसपासून वेगळा करून मागून उघड्या अवस्थेत बसला अहेरीला नेण्यात आले.
यापूर्वी सुद्धा अहेरी आगाराच्या धावत्या बसच्या वरच्या पत्र्याचा काही भाग उखडण्याचा प्रकार घडला होता. तशाच अवस्थेत बऱ्याच अंतरापर्यंत ती बस धावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा अहेरी आगाराच्या खिळखिळ्या बसचा नमुना समोर आल्याने अहेरी आगारातील बसगाड्यांच्या देखभाल दुरूस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विमानतळाआधी चांगल्या बसगाड्या द्या
या प्रकारावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सरकारवर आसूड ओढले. आम्ही अनेक वेळा आंदोलनांमधून जिल्ह्यात सुस्थितीतील बसगाड्या देण्याची मागणी केली, मात्र सर्वसामान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारण्यात आली नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. एकीकडे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाकरिता सुरक्षित बसेस नाहीत, मात्र दुसरीकडे उद्योगपतींसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करून विमानतळ बनविण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि पुरेशा संख्येने नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
































