गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदावर नियुक्ती देण्यासंदर्भातील बनावट नियुक्ती आदेश तयार करून तीन महिलांना 5 लाख 40 हजार रुपयांनी गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. राकेश मुंगेलवार असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे या फसवणूक प्रकरणात आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का, किंवा या पद्धतीने आणखी किती जण फसल्या गेले याची माहिती पुढे येणार आहे.
या प्रकरणात देवराव उराडे यांचे नाव समोर आले होते, मात्र ते आरोपीसोबत गुन्ह्यात सहभागी नसून उराडे यांचीही आरोपीने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात शिपाई पदावर नोकरी देण्यासंदर्भातील बनावट नियुक्तीपत्र मुंगेलवार याने तयार केले होते. सप्टेंबर 2025 पासून हा फसवणुकीचा गोरखधंदा आरोपी राकेश मुंगेलवार याच्याकडून सुरू होता. यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन मोरगावच्या दोन महिलांकडून त्याने पैसे उकळले. यापूर्वी जिल्हा परिषदेत शिपाई पदाची बनावट जाहीरात तयार करून ती समाज माध्यमावर फिरत होती. बेरोजगारांना हेरण्यासाठी आणि नंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्र देऊन पैसे उकळण्यासाठीच ती जाहीरात बनविल्या गेल्याचा संशय आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ती जाहीरात बोगस असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. आता हा बनावट नियुक्तीपत्राचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
































