गडचिरोली : नीट परीक्षेत घोळ केल्यानंतर आता शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या टीईटी परीक्षेचा पेपर फोडल्याने लाखो भावी आणि विद्यमान शिक्षकांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे हे सर्व होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या वतीने करण्यात आली. त्यासाठी इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

टीईटी परीक्षा सेवेत असलेल्या शिक्षकांसह शिक्षणशास्त्राची पदवी घेणाऱ्या युवा वर्गासाठीही घेण्यात येणार होती. त्यासाठी शासनाने पूर्वनियोजनही केले होते. जिल्हा पातळीवर प्रशासनाने नियोजनबद्ध परीक्षा केंद्र निश्चित करून ठेवले. परीक्षेच्या एक दिवस अगोदर अनेक शिक्षक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी (गावी) दाखल झाले होते. मात्र दुपारच्या सुमारास पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परीक्षा मंडळाने जाहीर केले. यामुळे अनेकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
अतिशय महत्वाच्या परीक्षांचे पेपर राज्यात वारंवार फुटत असल्याने प्रशासकीय यंत्रणा व शासन याबाबत गंभीर नाही, असा आरोप करत पेपर फोडणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जात नसल्यानेच वारंवार असे प्रकार घडत असल्याची प्रतिक्रिया मोटघरे यांनी दिली. या प्रकारात प्रशासकीय यंत्रणेचा तर सहभाग नाही ना? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. पेपर फोडणाऱ्यांवर अतिशय कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कुणीही पेपर फोडण्याची हिम्मत करणार नाही, अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.
परीक्षेत पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासाहर्ता टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाईन परीक्षा प्रभावी पर्याय असून टीईटी परीक्षा तातडीने ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, सर्वच संबंधित विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी अशा मागण्याही करण्यात आल्या.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.विश्वजीत कोवासे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश महासचिव (सोशल मिडिया) नंदू वाईलकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे अध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडियाचे अध्यक्ष संजय चन्ने, जिल्हा महासचिव प्रभाकर वासेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जितू मुनघाटे, हेमंत मोहितकर, जावेद खान, कल्पना नंदेश्वर, रिता गोवर्धन, पौर्णिमा भडके, माधुरी मडावी, कविता उराडे, शालिनी पेंदाम, मंजू आत्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































