Home पब्लिक प्रॉब्लेम अहेरी महिला-बाल रुग्णालयातील रिक्त पदे महिनाभरात भरणार

अहेरी महिला-बाल रुग्णालयातील रिक्त पदे महिनाभरात भरणार

धर्मरावबाबांचा प्रश्न; आरोग्यमंत्र्यांचे उत्तर

अहेरी : येथील 100 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील तज्ज्ञ डॅाक्टरांसह इतर रिक्त पदांचा प्रश्न माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत मांडला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यभरात 5 हजार पदांच्या मान्यतेअभावी ही पदे रिक्त राहिली. पण तो प्रश्न आता निकाली निघाला असून पुढील महिन्यापर्यंत अहेरी रुग्णालयातील पदे भरली जातील, असे स्पष्ट केले.

अहेरीत अत्याधुनिक व सुसज्ज अशी 100 खाटांची महिला व बाल रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे. आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर यांनीही या रुग्णालयाला भेट देऊन या सुसज्ज इमारतीचे कौतुक केले होते. मात्र आवश्यक रिक्त पदे भरली नसल्यामुळे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे भव्य आणि सुसज्ज इमारत असूनही तिचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसून, नागरिकांना अपेक्षित आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. ही बाब आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील 5 हजार पदांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पदमान्यतेचा अडथळा दूर झाला असून, येत्या महिनाभरात बैठक घेऊन अहेरीसह आवश्यक रुग्णालयांतील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यामुळे अहेरीच्या महिला व बाल रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.