सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या इंद्रावती नदीच्या पात्रातून छत्तीसगडमध्ये सागवानाची तस्करी करण्याचा प्रयत्न वनविभागाच्या पथकाने हाणून पाडला. या कारवाईत 2 घटमीटर आकाराचे 27 लाकडाचे ओंडके जप्त करण्यात आले. तराफा बनवून हे ओंडके नदीच्या प्रवाहात सोडण्यात आले होते. (खाली वाचा)

असरअल्ली वनपरिक्षेत्रातील बोतलमडगू कॅम्पजवळ मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या लाकडांची किंमत 2 लाखांपेक्षा जास्त आहे. छत्तीसगडच्या दिशेने वाहणाऱ्या नदीपात्रातून सागवानाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने सापळा रचला.
तस्करांनी नदीच्या वेगवान प्रवाहाचा फायदा घेत लाकूड नदीत सोडले होते. मात्र वनकर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ते ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून या आंतरराज्यीय तस्करीचा पर्दाफाश करण्याचे आव्हान वनविभागासमोर आले आहे.
































