गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात सुविधांअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होण्याची घटना नवीन नाही. मात्र चक्क जिल्हा महिला व बाल रुग्णालयात भरती असताना झालेल्या प्रसुतीत संबंधित मातेसह तिच्या बाळाला वाचवण्यात वैद्यकीय पथकाला यश आलेले नाही. आठवडाभरात प्रसुतीदरम्यान माता आणि बालमृत्यूच्या दोन घटना घडल्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागातील, आणि तज्ज्ञ डॅाक्टरांच्या देखरेखीत चालणाऱ्या आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (खाली वाचा)

नाजुका दिवाकर राऊत (28 वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. नागभिड तालुक्यातील कोजबी गावातील रहिवासी असलेल्या नाजुका प्रसुतीसाठी आपल्या माहेरी चकपिरंजी (ता.सावली) येथे आल्या होत्या. त्यांना दि.28 आॅगस्टच्या रात्री गडचिरोलीच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि.29 ला सकाळी सामान्य प्रसुती झाली. मात्र काही वेळातच सुदृढ असलेल्या बाळाचा मृत्यू झाला. प्रसुतीनंतर काही वेळाने नाजुका यांना रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती गंभीर होत असल्याने स्रीरोगतज्ज्ञ डॅा.प्रवीण किलनाके आणि डॅा.प्रशांत आखाडे यांना बोलवण्यात आले. पण ते पोहोचेपर्यंत महिलेचे प्रकृती आणखी जास्त बिघडली.
यादरम्यान शस्रक्रिया करून रक्तस्राव नियंत्रित करून रक्त चढवण्यात आले. दुपारी 3 वाजताच्या सुमारास प्रकृती थोडी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र दि.29 च्या मध्यरात्री नाजुका यांना झटके येण्यास सुरूवात झाली. जवळपास एक तास सुरू असलेल्या उपचारानंतर रात्री 1.30 च्या सुमारास त्यांचा मृ्त्यू झाला.
नातेवाईक म्हणतात, रक्त मिळण्यास विलंब
सदर महिलेला रक्ताची गरज असताना वेळेवर रक्त देण्यास रुग्णालयाच्या यंत्रणेने विलंब केला, त्यामुळे नाजुका यांची प्रकृती जास्त गंभीर झाली असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या महिनेसह तिच्या बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. आठवडाभरापूर्वी हाच प्रसंग चामोर्शी तालुक्यातील जिजा सातर या महिलेवर ओढवला आणि तिच्यासह तिच्या बाळाला प्राण गमवावे लागले.
































