गडचिरोली : जिल्ह्यातील चौदाशे ग्रामसभांच्या सक्षमीकरणासाठी लेखामेंढा येथील ग्रामसभा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत महत्त्वाची बैठक ग्रामसभा कार्यालय लेखा-मेंढा येथे झाली आणि त्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. यासाठी कोरची ते सिरोंचापर्यंत विराट ग्रामसभा यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (खाली वाचा)

या चर्चेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.प्रणय खुणे सहभागी झाले होते. तसेच प्रामुख्याने ग्रामसभा पुसेर इलाका येथील ग्रामसभेचे पदाधिकारी न कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने या विषयाला मूर्त रूप देण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये “मावा नाटे मावा राज” पुन्हा आले पाहिजे, जल जंगल जमीन आमची आहे, ग्रामसभा हीच सर्वश्रेष्ठ व वरिष्ठ सभा आहे हे पेसा क्षेत्रातील नागरिकांवर बिंबवण्यासाठी, जिल्ह्यातील ग्रामसभांचे हक्क व अधिकार काय आहेत याबद्दल जाणीव जागृती ही ग्रामसभा यात्रा काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामसभांकडून त्यांच्या समस्यांची माहिती करून घेण्यात येणार आहे. त्या समस्यांची प्रश्नावली तयार करून ती केंद्र सरकार व राज्य सरकारला, राज्यपालांना सादर केली जाणार आहे.
या चर्चेच्या वेळी डॅा.प्रणय खुणे, केसरी पाटील मट्टामी, इलाका कार्यकर्ता मधुकर कोवासे, सुरज पोटावी, कोमटी नरोटे, ग्रामसभा अध्यक्ष रामू हेडो, इलाका सचिव नामदेव मट्टामी, हरीश कुमरे, ग्रामसभा सचिव सुधाकर तुमरेटी, मानवाधिकार संघटनेचे रमेश अधिकारी, भीमराव वनकर, भामरागड तालुका मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































