Home क्राईम आसरअली वनपरिक्षेत्रात अडीच लाखांचे 36 नग सागवान जप्त

आसरअली वनपरिक्षेत्रात अडीच लाखांचे 36 नग सागवान जप्त

आठवड्यात दुसरी मोठी कारवाई

सिरोंचा : आसरअली वन परिक्षेत्रातून सागवान लाकडांची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध वन विभागाने आठवडाभरात दुसऱ्यांदा धडक कारवाई करत 36 नग सागवानाचे ओंडके जप्त केले.

कोपेला 1 नियतक्षेत्रातून तब्बल 36 सागवान नग (एकूण 2.18 घनमीटर) जप्त करण्यात आले आहेत. या सागवान लाकडांचे बाजार मूल्य 2 लाख 56 हजार 623 रुपये इतके आहे. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील सागवान तस्करांचे कंबरडे मोडले आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांच्या पथकाने कोपेला 1 नियतक्षेत्र परिसरात अचानक छापा टाकला. या कारवाई दरम्यान तस्करांनी लपवून ठेवलेला सागवान लाकडांचा साठा उघडकीस आला. वन पथकाने सर्व लाकूड त्वरित जप्त करून वन परिक्षेत्र कार्यालयात जमा केले आहे. भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत वनगुन्हा दाखल केला. लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती वनपरिक्षेत्राधिकारी शिवाजी पानगे यांनी दिली.

ही धडक कारवाई सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी आणि उपविभागीय वनाधिकारी अक्षय मीना यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली.