Home दैनंदिन बातम्या काहींनी अनुभवले भूकंपाचे कंपन; बहुतांश लोक मात्र साखरझोपेतच

काहींनी अनुभवले भूकंपाचे कंपन; बहुतांश लोक मात्र साखरझोपेतच

सिरोंचा-अहेरी तालुक्याच्या मध्ये केंद्र

गडचिरोली : जिल्ह्याच्या सिरोंचा आणि अहेरी तालुक्याच्या मध्यवर्ती भागात काल पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी झालेल्या भूकंपाचे कंपन साखरझोपेत असलेल्या बहुतांश लोकांना जाणवलेच नाही. त्यामुळे भूकंप येऊन गेल्याची माहिती त्यांना नव्हती. मात्र पहाटे उठणाऱ्या काही नागरिकांनी भूकंपाचा सौम्य हादरा अनुभवला. 3.6 तीव्रतेच्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहाणी झालेली नाही.

दि.3 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 36 मिनिटांनी आलेल्या या भूकंपाचे भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर असून त्याचे केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अहेरी तालुक्यातील अहेरी व नागेपल्ली परिसरातही भूकंपाचे कंपन जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती प्राप्त झालेली नाही.

नागरिकांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे घाबरून जाऊ नये. शांतता राखून आवश्यक ती दक्षता बाळगावी. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.