Home दैनंदिन बातम्या ग्रामसभांच्या सक्षमीकरणातून गावांच्या शाश्वत विकासावर भर

ग्रामसभांच्या सक्षमीकरणातून गावांच्या शाश्वत विकासावर भर

'पेसा'वर कार्यशाळा आणि पंच संमेलन

गडचिरोली : ग्रामसभा ही गावाच्या विकास प्रक्रियेचा महत्त्वाचा आधार असून ग्रामसभांना सक्षम करतानाच उपलब्ध शासकीय योजना व संसाधनांचे योग्य नियोजन करून प्रत्येक गावाचा मूलभूत सुविधांसह सर्वांगीण व शाश्वत विकास साधावा. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक, परिणामकारक आणि लोकाभिमुख पद्धतीने करून त्यांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५ (VB–G RAM G) तसेच पेसा अधिनियम यांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सुमानंद सभागृह, गडचिरोली येथे आयोजित एक दिवसीय कार्यशाळा तथा पंच संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गजेंद्र नरवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. तसेच ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या राज्य पेसा कक्षाचे संचालक शेखर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे नाशिक येथे नियोजित बैठकीस उपस्थित राहणार असल्याने त्यांनी या अभियानासाठी शुभेच्छा व मार्गदर्शनपर व्हिडिओ संदेश पाठविला. त्यांचा हा संदेश कार्यशाळा व पंच संमेलनादरम्यान उपस्थितांना दाखविण्यात आला.

प्रत्येक गावाच्या गरजांनुसार विकासाचे नियोजन करा

जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, ग्रामीण आणि विशेषतः अनुसूचित क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे आवश्यक आहे. गावातील मूलभूत सुविधांची स्थिती, स्थानिक गरजा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या तसेच अद्याप लाभापासून वंचित असलेल्या नागरिकांची माहिती विचारात घेऊन विकासाचे नियोजन व्हावे.

विविध विभागांकडे गावांच्या विकासासाठी अनेक योजना व संसाधने उपलब्ध आहेत. त्यांचा समन्वयातून प्रभावी वापर केल्यास गावांच्या विकासाला अधिक गती देता येईल. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केवळ प्रशासकीय प्रक्रिया म्हणून न करता त्यातून नागरिकांच्या जीवनमानात प्रत्यक्ष सकारात्मक बदल घडला पाहिजे. योजना राबविताना पारदर्शकता, गुणवत्ता आणि परिणामकारकतेला प्राधान्य देऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचत आहे की नाही, याकडे क्षेत्रीय यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.

ग्रामसभेच्या सक्रिय सहभागावर भर – सहपालकमंत्री

सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्थानिक गरजांनुसार विकासाचे नियोजन करणे आणि ग्रामसभांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जी राम जी आणि पेसा कायद्याबाबत मार्गदर्शन

कार्यशाळेत विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, 2025 अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची हमी, आजीविका बळकटीकरण, ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन आणि कामांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांचे अधिकार व जबाबदाऱ्या, ग्रामसभांचे सक्षमीकरण, स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका, नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन तसेच विकास प्रक्रियेत लोकसहभाग वाढविण्याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘ग्रामसभा सक्षम तर गाव सक्षम आणि गाव सक्षम तर विकसित भारत सक्षम’ या संकल्पनेतून अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांना अधिक सक्षम करून स्थानिक पातळीवरील विकासाच्या निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा – सुहास गाडे

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती दिली. ग्रामीण नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी योग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि विविध विभागांतील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने सक्रियपणे काम करावे. ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध योजनांचा प्रभावी वापर करून रोजगार, आजीविका आणि मूलभूत सुविधांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर द्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

जिल्हाभरातील अधिकारी, लोकप्रतिनिधींचा सहभाग

या कार्यशाळा व पंच संमेलनाला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व प्रशासक, जीरामजी अंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व तांत्रिक सहाय्यक तसेच पेसा कक्षातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामसभांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पंच संमेलन व एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पंकज भोयर आणि व्हीबी जी राम जी योजनेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक चेतन हिवंज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगलदास मेश्राम, जिल्हा पेसा समन्वयक प्रमोद भोयर आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी भास्कर राऊत यांच्यासह संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजन व समन्वय केला.