गडचिरोली : नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळात नऊ दिव्यांग विद्यार्थिनींनी गरबा नृत्य सादर करून उपस्थित भाविक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आत्मविश्वास, जिद्द आणि कलागुणांचा सुंदर अविष्कार घडविणाऱ्या या विद्यार्थिनींच्या नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थिनींच्या या विशेष सहभागामुळे कारगिल चौकातील गरबा आयोजनाला सामाजिक समावेशकतेची भावपूर्ण किनार लाभली. (खाली वाचा)

कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या गरबा आयोजन प्रमुख सुचिता उदय धकाते यांच्या पुढाकारातून दिव्यांग विद्यार्थिनींना गरबा सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. अनेक वर्षांपासून गरबा खेळण्याची इच्छा असलेल्या या विद्यार्थिनींना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग विद्यार्थिनींच्या प्रशिक्षिका भुमेश्वरी हुकरे-वाढई यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि मंडळाच्या सहकार्याने विद्यार्थिनींना गरब्यात सहभागी होता आले.
जिद्द, आत्मविश्वास आणि कलेचा सुंदर संगम!
नऊ विद्यार्थिनींनी तालबद्ध पावलांनी आणि उत्साहपूर्ण नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. दिव्यांगत्वावर मात करत त्यांनी सादर केलेल्या गरब्यातून जिद्द, आत्मविश्वास आणि संधी मिळाल्यास आपले कौशल्य सिद्ध करण्याची क्षमता अधोरेखित झाली. त्यांच्या नृत्याला उपस्थित भाविक भक्तांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या विद्यार्थिनींच्या सहभागाचे कौतुक म्हणून वसंत विद्यालय गडचिरोलीच्या मुख्याध्यापिका सुचिता कामडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उपस्थितांचा उत्साह यामुळे हा सोहळा विशेष ठरला.
सर्वांसाठी खुला गरबा; दररोज बक्षिसांचे आयोजन
कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळात गरबा खेळणाऱ्या सर्वांना निःशुल्क प्रवेश दिला जातो. तसेच सहभागींचा उत्साह वाढविण्यासाठी मंडळातर्फे दररोज बक्षिसे दिली जातात. उत्सवाचा आनंद सर्वांना घेता यावा आणि दिव्यांग व्यक्तींनाही समान संधी मिळावी, या भावनेतून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या निलिमा देशमुख, रुपाली शेरके, संगीता धकाते, विद्या कुमरे आदींनी परिश्रम घेतले. संचालन वैभव रामटेके यांनी केले.
































