गडचिरोली : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्न व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती व काँग्रेस पक्षाच्या वतीने महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली ते नागपूर विधानभवन असा 175 किलोमीटरचा भव्य पायी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. 1 ते 8 डिसेंबर 2026 या कालावधीत निघणाऱ्या या मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी आवाज उठविण्यात येणार आहे.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विमानतळ, एमआयडीसी, समृद्धी महामार्ग यांसह इतर प्रकल्पांसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करावी, त्यांची संमती घ्यावी आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये, यासाठी हा मोर्चा राहणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतीसाठी सोलर कृषीपंप व ऐच्छिक विद्युत कृषीपंप उपलब्ध करून द्यावेत, तसेच शेतीसाठी 24 तास अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाघ, हत्ती व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अल्प पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द कालव्याच्या विस्तारीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून अधिकाधिक गावांतील शेतजमिनींना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या मोर्चातून केली जाणार आहे.
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत मागील चार-पाच वर्षांपासून रानटी हत्ती व वाघांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जीवितहानी व शेतीचे नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि रानटी हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, जड वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, वनहक्क पट्टेधारकांचे प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावेत, धानाला बोनस देऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, रिक्त पदांची तातडीने भरती करावी आणि 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नयेत, अशी भूमिकाही या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.
अशा विविध मागण्यांसाठी आयोजित हा पायी मोर्चा 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून सुरू होऊन 8 डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर धडकणार आहे. आपल्या हक्कांसाठी, अस्तित्वासाठी आणि भूमीच्या रक्षणासाठी शेतकरी, शेतमजूर, युवक, महिला, विद्यार्थी व नागरिकांनी या लढ्यात एकजुटीने सहभागी व्हावे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, महिला, शेतकरी व नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
































