Home राजकीय घडामोडी आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

भरती रुग्णांना मदतीचा हात !

गडचिरोली : आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजकीय उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आदर्श निर्माण केला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात आली.

यानंतर जिल्हा महिला व बाल रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच ‘माणुसकीचा घास’ या उपक्रमांतर्गत गरजू रुग्ण व नागरिकांसाठी भोजनदान करण्यात आले. सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव आणि सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा सहसचिव संतोष कोडापे, जिल्हा संघटनमंत्री शत्रुघ्न ननावरे, तालुका अध्यक्ष निखिल चावरदाणे, उपाध्यक्ष रवींद्र सिडाम, तालुका सचिव संदीप गेडाम, सहसचिव खोमेश बोबाटे, महासचिव रवींद्र धाकडे, हर्षा कोडापे, तुषार मडावी, प्रितम मडावी, मोसम मेश्राम यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.