

गडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्हाभरात नवरात्रौत्सवानिमित्त अनेक ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यातील अनेक मंडळांकडून दररोज रात्री आयोजित केल्या जाणाऱ्या गरबा, दांडिया नृत्यात तरुण वर्गासह महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. याशिवाय देवीचे दर्शन आणि गरबा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणाने जिल्हा भारावून गेला आहे. (खाली वाचा)

गडचिरोली शहरात कॅाम्प्लेक्स परिसरातील टी-पॅाईंट, अभिनव लॅान, कात्रटवार कॅाम्प्लेक्स, शिवाजी महाविद्यालयाजवळील मैदान, कारगिल चौक या प्रमुख ठिकाणांसह काही कॅालन्यांमध्ये गरबा नृत्यात मोठ्या संख्येने युवा पिढीसह महिला-पुरूषही सहभागी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दररोज उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना पुरस्कृतही केले जात आहे. रात्री 10 पर्यंतच मोठ्या आवाजात गाणी वाजविण्याची परवानगी असल्याने 10 वाजता गरबा बंद करावा लागतो. त्यामुळे अनेक उत्साही युवा वर्गाचा हिरमोड होत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस (अष्टमी, नवमी) रात्री 12 पर्यंत गरबा सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
आरमोरी शहरात अनेक मोठ्या मंडळांनी विविध देखावे तयार केले आहेत. ते देखावे पाहण्यासाठी संध्याकाळी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने लोक आरमोरीत दाखल होत आहेत. दक्षिण भागात दुर्गादेवीसह बतकम्मा उत्सवाचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या बतकम्माभोवती फेर धरून महिला नृत्य करत मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करतात.
































