Home दैनंदिन बातम्या अमृत आहार स्वयंपाकीन संघटना अधिवेशनावर करणार आंदोलन

अमृत आहार स्वयंपाकीन संघटना अधिवेशनावर करणार आंदोलन

कुरखेडात महिलांच्या बैठकीत निर्णय

कुरखेडा : राज्यभरातील पेसा ग्रामपंचायतमधील अंगणवाड्यांमध्ये गरोदर मातांना पौष्टीक आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकीन महिलांना डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत सन 2016 पासून मिळणारे मानधन अवघ्या 1 हजारवरून गेल्यावर्षी 2 हजार करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ते 5 ते 7 हजार असावे या मागणीसाठी अमृत आहार स्वयंपाकीन संघटना येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करणार आहे. कुरखेडा येथे झालेल्या महिलांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. (खाली वाचा)

या स्वयंपाकी महिलांनी आदर्श महिला अमृत आहार स्वयंपाकीन संघटना स्थापन करून मानधन वाढीसाठी शासन, प्रशासनास अनेक निवेदने सादर केली. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, महिला व बालकल्याणमंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव, आयुक्त यांची वारंवार प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदने सादर केली. त्यात मानधन एक हजार रुपयांवरुन किमान 5 ते 7 हजार करण्याची मागणी केली होती. मात्र आदिवासी विकास विभागाचे सन 2025 च्या शासन निर्णयानुसार केवळ एक हजार रुपये मानधनवाढ करुन प्रतिमहीना दोन हजार रुपये मानधन लागु केले.

त्यामुळे स्वयंपाकीन महिलांचे मानधन तात्काळ वाढवून ते पाच ते सात हजार रुपये करावे, प्रत्येकीच्या बँक खात्यात महीनेवारी मानधन जमा करण्यात यावे. प्रत्येक महिन्यात कोणत्याही शर्ती, अटी न ठेवता मानधन जमा करावे. महत्वाचे म्हणजे स्वयंपाकीण महीलांचा कंत्राटी कर्मचारी असा उल्लेख करण्यात यावा. आणि ज्यांची 10 वर्षे सेवा पुर्ण झालेली आहे, अशा डॉ.एपीजे अमृत आहार योजनेतील स्वयंपाकीन महिलांचे त्यांच्या शिक्षणानुसार शासकीय सेवेत समायोजन करावे अशा मागण्या पुढे आल्या आहेत.

याकरीता शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता येत्या हिवाळी अधिवेशनात लोकशाहीच्या मार्गाने संविधानिक अधिकारांनुसार लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कुरखेडा येथील बैठकीदरम्यान आदर्श अमृत आहार स्वयंपाकीन संघटनेच्या महीलांनी कळविले.

या बैठकीत राष्ट्रीय लोकआंदोलन न्यासचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, आदर्श महीला अमृत आहार स्वयंपाकीन संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष गिता उईके, सचिव सोनी ठवरे, उपाध्यक्ष संगीता जाडे, कोषाध्यक्ष गिता धुर्वे, प्रियंका रामटेके, सदस्य संगीता जाडे, जिल्हा सहसचिव ममता नाकाडे, सदस्य सविता उईके, अश्विनी गुरुदेव, शारदा शिंदे, ऋृंदा नागोसे, रजनी बोरकर, रेवता स्वामी, हेमलता भोयर, पिरम घरत, सुरेखा नरोटे, संध्या लोहंबरे, अनिता कुलकवर, जयमाला बावणे, सविता सुतारे, ललीता डोंगरावर, उषा सहारे, कल्पना मडावी, आशा गेडाम, कल्पना सहारे, मंगला कवडो, माहेश्वरी कुमरे, रविना मडावी, दीपिका मडावी, संध्या जनबंधू, विमला ठराव, अर्चना बावणे, सरीता गावडे, उषा सहारे यांच्यासह गरोदर मातांना अमृत आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकीन महीला बैठकीला उपस्थित होत्या.