
भामरागड : तालुक्यातील मल्लमपोडूर ग्रामपंचायतअंतर्गत भुसेवाडा गावाला जोडणाऱ्या बेली ब्रीजचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. हे काम अर्धवट स्थितीत असून अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना, वाहनधारकांना अजूनही वाहत्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. विशेष म्हणजे हे काम असे अर्धवट स्थितीत बंद का आहे, याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे स्पष्टपणे द्यायला तयार नाही. त्यामुळे हे अर्धवट काम तातडीने सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भारतीय कॅाम्युनिस्ट पार्टीने (CPI) ग्रामस्थांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दिला आहे. (खाली वाचा)

पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर नागरिकांना ये-जा करणे धोकादायक ठरते. अनेकदा गावाचा इतर भागांशी संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळे येतात, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे कठीण होते, तर बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले आणि गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे कठीण होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व इतर वाहनांच्या वाहतुकीतही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अनेक वर्षांपासून मंजूर बेली ब्रीजचे काम अपूर्ण राहणे ही गंभीर बाब आहे. हे काम नेमके कोणत्या कारणामुळे थांबले आहे, कामात कोणते प्रशासकीय, तांत्रिक किंवा आर्थिक अडथळे आहेत, याची माहिती संबंधित विभाग स्पष्ट देण्यास तयार नाही. प्रभारी अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण यांना याबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
हे काम रखडण्यामागील वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडून सर्व अडथळे तातडीने दूर करावेत आणि बांधकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी सीपीआयने केली आहे.
गावात बैठक; आंदोलनाचा निर्णय
भुसेवाडा गावात भारतीय कॅाम्युनिस्ट पार्टीच्या प्रतिनिधींसोबत स्थानिक नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बेली ब्रीजचे काम अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, पावसाळ्यात निर्माण होणारा धोका आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागाने कामातील अडथळे दूर करून बांधकाम तातडीने सुरू करावे, अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सुरक्षित दळणवळणासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सीपीआयचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांनी केली आहे.
यावेळी जिल्हा सदस्य सुरज जक्कुलवार आणि भुसेवाडा येथील नागरिक उपस्थित होते.
































