Home दैनंदिन बातम्या संघाच्या विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांची विविध प्रात्यक्षिके

संघाच्या विजयादशमी उत्सवात स्वयंसेवकांची विविध प्रात्यक्षिके

शताब्दी वर्षात पंचपरिवर्तनाचा संदेश

गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गडचिरोली नगराच्या वतीने आयोजित विजयादशमी उत्सव रविवारी (दि.18) सायंकाळी गोकुळनगर येथील शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तनाचा संदेश देण्यात आला. स्वयंसेवकांनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. (खाली वाचा)

राष्ट्रभक्ती, सामाजिक एकात्मता आणि समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 192 बटालियनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत मुरारी कुंभरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद महानकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. (खाली वाचा)

यावेळी जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, नगर संघचालक नीलकंठ भांडेकर, तालुका संघचालक उरकंट राऊत यांच्यासह संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतपूर्तीच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. संघाच्या स्थापनेमागील उद्देश, समाजातील एकात्मता आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी संघाने केलेले कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तन या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा आग्रह आणि नागरिक कर्तव्य या पाच विषयांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहन करण्यात आले. पंचपरिवर्तन ही केवळ संघटनात्मक संकल्पना नसून प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची सामाजिक जबाबदारी असल्याचे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.

गडचिरोली नगरात विविध भागांत सुरू असलेल्या सुमारे 32 ते 33 शाखांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले. शाखांच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्याबरोबरच समाजातील विविध क्षेत्रांत सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमूद करण्यात आले.