

अहेरी : माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांचा वाढदिवस 20 ऑक्टोबर रोजी हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्गोत्सव, दसरा आणि वाढदिवस एकत्र आल्याने अहेरीत उत्साह शिगेला पोहोचला होता. दरम्यान बुधवारी झालेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीत धर्मरावबाबांनी सहभागी होऊन पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेकाही धरला.
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजवाडा निवासस्थानी दरवर्षी दुर्गोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा दुर्गोत्सव, दसरा महोत्सव आणि आमदारांचा वाढदिवस असा त्रिवेणी संगम साधला गेल्याने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. आकर्षक रोषणाई, विविध कार्यक्रम आणि चाहत्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वाढदिवसाचा सोहळा विशेष रंगतदार ठरला. सकाळपासूनच आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी समर्थक, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
तुलाविधीपासून अन्नदानापर्यंत सामाजिक उपक्रम
आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी काही ठिकाणी लाडूतुला केली, तर विविध ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. काही चाहत्यांनी आमदारांची हुबेहूब प्रतिमा भेट देत आपली भावना व्यक्त केली. याशिवाय रुग्णांना फळवाटप, अन्नदान आणि अन्य सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.
दिवसभर विविध कार्यक्रमांनी परिसर गजबजलेला असताना रात्री आयोजित करण्यात आलेल्या दुहेरी कव्वालीने सोहळ्यात आणखी रंग भरला. कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या उत्साहामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला.
सिनेअभिनेते चेतन हंसराज यांची विशेष उपस्थिती
आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवस सोहळ्याला सिनेअभिनेते चेतन हंसराज यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी धर्मरावबाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये दिलखुलास चर्चा झाली. चेतन हंसराज यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थिती दर्शविल्याने कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या उत्साहात आणखी भर पडली. आपल्या आवडत्या अभिनेत्याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळाली. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
कुटुंबीयांकडून केक कापून औक्षण
आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांचे पुत्र हर्षवर्धनबाबा आत्राम, कन्या तनुश्री आत्राम तसेच कुटुंबातील सदस्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी परिवारातील महिलांनी औक्षण केले. आकर्षक रोषणाईत पार पडलेल्या या सोहळ्यात लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कुटुंबीयांच्या शुभेच्छा, चाहत्यांची गर्दी, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिनेअभिनेते चेतन हंसराज यांच्या उपस्थितीमुळे धर्मरावबाबांचा वाढदिवस अहेरीकरांसाठी एक पर्वणी ठरला.
































