कुमकोट राजेश्वरी देवीच्या उत्सवाला उसळली ६० गावातील भाविकांची गर्दी

कसा होता माहौल, पहा व्हिडिओ

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कुमकोट येथे कंकालकारो राजेश्वरी देवीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील राजवैद्य पुजाऱ्यांनी बांबूला विविध रंगांचे झेंडे लावून जत्रेच्या सभोवताल तीन फेऱ्या मारल्या. पुजास्थळावर लोखंडी सळाखीने अंगावर मारत पारंपरिक विधी करण्यात आले. यावेळी तहसीलदार, वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

कुमकोटच्या कंकालकारो राजेश्वरी राजमाता देवीच्या पुजेची आणि जत्रेची प्रथा अनेक वर्षांपासून कायम आहे. ६० गावांपेक्षा जास्त गावांतील भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. देवीच्या आशिर्वादाने मनोकामना पूर्ण होते असा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कुमकोट येथे बुधवारी भाविकांची गर्दी उसळली होती.

येथील मातेश्वरी मंदिरात कित्येक वर्षांपासून देवीचे वाहन म्हणून मातीचे हत्ती व घोडे आहेत. दरवर्षीप्रमाणे ६० गावातील लोकांनी नियुक्त केलेल्या राजवैद्याला येथे पुजेचा मान असतो. येथील पुजा राजवैद्य राजीमसाय रामसाय कल्लो रा.कुमकोट यांनी केली. यानंतर गावातील सर्व राजवैद्य पुजाऱ्यांनी बांबूला विविध रंगांचे झेंडे लावले. त्याला घेऊन जत्रेच्या सभोवताल तीन फेऱ्या मारताना भाविक त्यांच्यावर मुरमुरे टाकतात. शेवटी पुजास्थळावर पोहोचल्यानंतर लोखंडी साखळीने स्वत:वर प्रहार करत नंतर शांत केले जाते.

बुधवारी येथील मंदिरात पूजेचे कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. ठाकरे यांनी केले. तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या हस्ते मंदिरात दीप प्रज्वलित करुन पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी अॅड.अविनाश नाकाडे, प्रमुख अतिथी म्हणून मनोज अग्रवाल, सियाराम हलामी, सदाराम नुरुटी, रामदास मसराम, परसराम टिकले, अॅड.जी.एम.नागमोती, प्रतापसिंह गजभिये, अशोक कराडे, दामिनी शेंडे, दीपिका मडावी, गाते तलाठी, राहुल अंबादे, राष्ट्रपाल नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक राहुल अंबादे यांनी तर संचालन विनोद भजणे, आभार देवानंद काशिवार यांनी मानले.

अशी आहे या परंपरेमागे कहाणी

हजारो वर्षांपूर्वी कंकालकारो राजेश्वरी राजमाता कुमकोटच्या परिसरात आश्रयाला आली. त्यावेळी ही म्हातारी गुरे-ढोरे चारणाऱ्या लोकांना दिसली. त्या लोकांनी म्हाताऱ्या मातेजवळ जाऊन तुम्ही कोण आहात, कुठून आलात अशी विचारणा केली. त्यावर त्या म्हातारीने त्या लोकांना मी बाहेरगावाहून या परिसरात वास्तव्यास आलेली आहे. मला राहण्यासाठी या ठिकाणी एक झोपडी बनवून द्या, मी इथेच राहणार आहे असे सांगून लोकांना प्रसाद म्हणून एक मूठ अन्न शिजवून दिले. सर्व लोकांनी अन्न खाल्ल्यानंतरही ते अन्न संपत नव्हते. त्यामुळे ती म्हातारी कोणीतरी आपला सांभाळ करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे, असे मानून त्याच ठिकाणी गवताची झोपडी तयार करण्यात आली. चार-पाच दिवसांनी पुन्हा गावकरी त्या मातेला भेटायला आले, पण त्यावेळी माता त्यांना दिसली नाही. त्यामुळे मातेच्या स्वरूपात आदिवासी लोकांनी मातीच्या वस्तू जसे हत्ती, घोडा या ठिकाणी तयार करून मातेची पुजा करू लागले. ही पूजाअर्चना करत असताना लोकांची मनोकामना पूर्ण होत गेली. त्यामुळे लोकांचा विश्वास वाढत गेला. आजही या परिसरातील सर्व लोकांना ती राजेश्वरी माता आपली रक्षक असल्याचे वाटते. त्यातूनच ही जत्रेची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.