गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सदस्यपदासाठी काढलेल्या सोडतीनंतर त्यावर अनेक सूचना प्राप्त झाल्या. त्यावर विचारमंथन केल्यानंतर अंतिमत: एकूण 153 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

अंतिम केलेले आरक्षण नागरिकांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रदर्शित करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती गणांच्या सदस्यपदांच्या आरक्षणासाठी सोडत कार्यक्रम जाहीर केला होता. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील 51 जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि 102 पंचायत समिती गणांच्या सदस्यपदांसाठी आरक्षण निश्चित करण्याचा सोडत कार्यक्रम दि. 13 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर पार पडला. सोडत कार्यक्रमानंतर प्रारुप आरक्षण अधिसूचना दि.14 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
यानंतर आलेल्या सूचनांचा विचार करून आता जिल्ह्यातील एकूण 153 जागांसाठी अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ही अंतिम अधिसूचना दि.3 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
































