कडकडाट अन् गडगडाटासह वादळी पावसाने उडाली गडचिरोलीकरांची झोप

अवकाळी बिघडविणार प्रचाराचे वेळापत्रक

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन जोरात आलेला असताना रविवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या वादळी पावसाने आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह ढगांच्या गडगडाटाने गडचिरोलीकरांची झोप उडाली. दुसरीकडे सलग दोन दिवस असे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे निवडणूक प्रचाराच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथे जाहीर सभा होणार आहे. त्या सभेला पूर्व विदर्भातील महायुतीचे सर्व उमेदवार हजर राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या मुलचेरा, अहेरी, सिरोंचा तालुक्यात सभा होणार आहेत. वातावरण खराब असल्यास हेलिकॅाप्टर उडू शकणार नाही. त्यामुळे प्रचाराचे शेड्युल बदलावे लागण्याची शक्यता आहे.

सोमवारी सकाळीही जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाचा गडगडाट आणि पावसाच्या सरी बरसत होत्या.

उघड्यावरच्या धानाला फटका

विशेष म्हणजे धानाची भरडाई सुरू न झाल्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने ठिकठिकाणच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान उघड्यावरच ठेवलेला आहे. तो ताडपत्र्यांनी झाकून असला तरीही उंदीर त्याचा फडशा पाडतात. त्यात वादळी पावसामुळे तो धान काही प्रमाणात भिजून खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.