अपघातग्रस्त व्यक्तीच्या उपचारासाठी मा.खा.नेते यांच्याकडून मदतीचा हात

भेट घेऊन कुटुंबियांना दिला धीर

गडचिरोली : व्याहाड बु. येथील भूपेंद्र ऊर्फ दादू गोविंदा मांदाडे यांचा काही दिवसांपूर्वी मोटारसायकलने हरणघाट मार्गावर अपघात झाला. त्यांची प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना तातडीने नागपूर येथील चिरायु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती व्याहाड बुज ग्रामपंचायतचे सदस्य दिवाकर गेडाम यांनी माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांना दिल्यानंतर त्यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान चिरायु हॉस्पिटलला जाऊन भूपेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला आणि उपचारासाठी आर्थिक मदतही केली.

यावेळी नेते यांनी डॅा.शशांक वरखडे यांच्याकडून रुग्णासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. उपचारात कुठलीही कसर ठेवू नका, या रुग्णाची आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी डॅाक्टरांना दिल्या. यावेळी मा.खा.नेते यांनी रुग्णाची आई व निशिगंधा मांदाडे यांना धीर देत मी तुमच्या पाठीशी आहे असा आधार दिला.

अशोक नेते यांनी दिलेला माणुसकीचा हात आणि दाखवलेली तत्परता संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली आहे.