संजय दैने गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी, संजय मीना यांच्याकडे नवी जबाबदारी

निवडणुकीच्या तोंडावर प्रशासकीय बदल

गडचिरोली : गेल्या अडीच वर्षांपासून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे संजय मीना यांची निवडणुकीच्या तोंडावर बदली झाली असून त्यांची जागा हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने हे घेणार आहेत. सोमवारी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले.

संजय मीना यांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याने औद्योगिक विकासाचे काही महत्वाचे टप्पे पार केले. मात्र कार्यकाळ संपल्याने त्यांची निवडणुकीच्या तोंडावर बदली करण्यात आली. त्यांची बदली कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्याकडे नवीन जबाबदारी येणार आहे.

राज्य सेवेतून पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत आलेले संजय दैने यांनी १९९८ ते २००० या कालावधीत गडचिरोलीत उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय चंद्रपूर येथे उपविभागीय अधिकारी आणि गोंदियात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २४ वर्षांपूर्वी एसडीओ म्हणून जबाबदारी सांभाळतानाचे गडचिरोली आणि आताचे गडचिरोली यात बराच बदल झालेला आहे. मात्र तरीही या वर्षात लोकसभा आणि पुढे विधानसभा निवडणुका शांततेत सांभाळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.