वीज कोसळून मृत्यू झालेल्या शंकरपूर व कुनघाड्यातील कुटुंबियांचे नेतेंकडून सांत्वन

घरी भेट देऊन केली आर्थिक मदत

चामोर्शी : दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन वीजही कोसळली. यात चामोर्शी तालुक्यातील शंकरपूर (हेटी) येथील वैभव चौधरी (21 वर्ष) आणि कुनघाडा रै.(गोवर्धन) येथील गुरूदास मणिराम गेडाम (42 वर्ष) या दोन इसमांचा गावालगतच्या शेतात वीज कोसळून मृत्यू झाला. माजी खा.अशोक नेते यांनी त्या दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.

अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विजेचा कडकडाट आणि वादळी पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये, शेतात असल्यास झाडाखाली उभे राहू नये. नागरिकांनी सतर्कता बाळगत काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच तहसीलदार प्रशांत गोरूडे यांच्याशी मोबाईलवर संपर्क करून मृतांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत देण्याची सूचना केली.

यावेळी भाजपच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, जेष्ठ नेते माणिक कोहळे, आदिवासी मोर्चाचे रेवनाथ कुसराम, सोशल मिडिया प्रमुख रमेश अधिकारी, तोताजी आभारे, नेमाजी चौधरी, अरुण किरमे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.