गडचिरोली : खरीप हंगाम 2022-23 मध्ये शासकीय आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला धान भरडाईसाठी राईस मिलर्सना देताना सहा कोटी रुपयांच्या धानाचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार आणि मार्कंडा-कंसोबा खरेदी केंद्राचा प्रमुख व्ही.ए.बुर्ले यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी संध्याकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी आणखी कोणाकोणाची नावे पुढे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभुत किंमत देण्याकरीता शासन विविध योजना राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासीबहुल भागात आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांच्या धानाची विविध खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाते. खरेदी केलेल्या त्या धानाची जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने नेमलेल्या मिलर्सना बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण करून त्यांच्याकडून भरडाई (मिलिंग) केली जाते. जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स व खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन-पावत्यांसह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात. मिलर्स उचल केलेल्या धानाची भरडाई करुन तयार होणारा तांदुळ जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अधिनस्थ शासकीय गोदामात जमा करतात. त्या जमा केलेल्या तांदळाच्या स्विकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात येतात. परंतू, काही अधिकारी/कर्मचारी यात गैरप्रकार करुन आपले आर्थिक हितसंबंध साधतात.
गडचिरोली जिल्ह्रातील उपप्रादेशिक कार्यालय घोटअंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना (हंगाम 2022-2023) या दरम्यान अपहार झाल्याच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. सदर चौकशीत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात हंगाम 2022-2023 या दरम्यान एकूण 59,947.60 क्विंटल धान खरेदी केला होता. त्यापैकी प्रत्यक्ष 31,532.58 Ïक्वटल धान जावक झालेला आहे. परंतु मिलर्सना दिलेल्या एकुण वितरण आदेशापैकी 28,415.02 क्विंटल धान (प्रतिक्विंटल 2040 रुपयेप्रमाणे किंमत 5,79,66,640 रुपये) मिलर्सना प्राप्त झाला नाही, तसेच गोदामात देखील शिल्लक नाही.
त्याचप्रमाणे महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकुण बारदाण्यांपैकी 71,038 नग (प्रतिनग 32.76 रुपयेप्रमाणे 23,27,204 रुपयांच्या) बारदाण्यांचा, असा एकूण 6 कोटी, 2 लाख, 93 हजार 845 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. याकरीता मार्कंडा (कं),आष्टी केंद्राचे तत्कालीन केंद्रप्रमुख व्ही.ए.बुर्ले, विपणन निरीक्षक आर.एस.मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही.ए.कुंभार, आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक जी.आर.कोटलावार आदी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापक आणि आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली यांच्या लेखी फिर्यादीवरुन आष्टी पोलिस स्टेशनला भादंवि कलम 420, 409, 465, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची गती तीव्र करुन आरोपी व्यंकटी अंकलु बुर्ले (46 वर्षे) या आदिवासी विकास महामंडळाचा कनिष्ठ सहाय्यक तथा मार्कंडा (कं)चा तत्कालीन केंद्र प्रमुख, रा.आष्टी ता.चामोर्शी, तसेच गजानन रमेश कोटलावार (36 वर्षे), या निलंबित प्रादेशिक व्यवस्थापक (आदिवासी विकास महामंडळ, यवतमाळ तथा तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली) रा.कुंदलवाडी ता.बिलोली जि.नांदेड यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. त्यांना चामोर्शीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले असता त्यांनी 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजुर केला आहे. तपासात राकेश सहदेव मडावी (प्रतवारीकार आ.वि.म.घोट) यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि सरीता मरकाम, पोउपनि. बालाजी सोनुने तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार यांनी केली आहे.