शेतकऱ्यांच्या उपोषणाने अस्वस्थ भाजप लोकप्रतिनिधींकडून ‘देवेंद्रा’चा धावा

नागपुरात भेट घेऊन घातले साकडे

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला दिवसा 12 तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांचे आठवडाभरापासून उपोषण सुरू आहे. दरम्यान सोमवारी (दि.4) खासदार अशोक नेते यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे आणि गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळीसुद्धा होते. शेतकऱ्यांची ही समस्या तातडीने दूर करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलावे, अशी गळ त्यांनी घातली. त्यावर ना.फडणवीस यांनी 12 तास वीज पुरवठा करण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. पण यावर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही खा.नेते यांना दिली.

गेल्या 26 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे हे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला खा.अशोक नेते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. याशिवाय ना.देवेंद्र फडणवीस यांच्याशी तेथूनच संपर्क करून या समस्येबद्दल त्यांना माहिती दिली. पण प्रत्यक्ष समस्या सुटल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास शेतकरी तयार नव्हते. बेमुदत उपोषण करत असलेले कोरेगांवचे शेतकरी श्याम मस्के यांची प्रकृती ढासळली आहे. तर इतर शेतकरी आळीपाळीने साखळी उपोषण करत आहेत. शेतकऱ्यांची समस्या लवकर दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे खा.नेते यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. त्यानंतर सोमवारी फडणीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या समस्येवर तोडगा काढण्याची गळ घातली. फडणवीस यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन ही वीज पुरवठ्याची समस्या लवकरच सोडविली जाईल, असे सांगितले. यावेळी उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना या विषयावर एक निवेदनसुद्धा दिले.

निवेदन देताना खासदार अशोक नेते यांच्यासह आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुकाध्यक्ष सुनील पारधी, वसंता दोनाडकर, बंगाली आघाडीचे नेते सुरेश शहा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.