‘विधानसभा तो बस ट्रेलर है, लोकसभा का पिक्चर बाकी है’

युवा संवादातून धर्मरावबाबांचे रणशिंग

गडचिरोली : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी गडचिरोलीत अभूतपूर्व असे युवक कार्यकर्त्यांचे संवाद शिबिर घेण्यात आले. दोन सत्रात झालेल्या या शिबिरातील दुसरे सत्र नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाने गाजले. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरावे अशी गळ पदाधिकाऱ्यांनी घातली, तर दुसरीकडे धर्मरावबाबा यांनीही आपली तशी ईच्छा आणि तयारी असल्याचे सांगत ‘विधानसभा तो ट्रेलर है, लोकसभा अभी बाकी है’ है म्हणून पदाधिकाऱ्यांनी घातलेल्या सादला प्रतिसाद दिला. मात्र महायुतीचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतील त्यानुसार आपली भूमिका राहील, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

‘युवा संवाद-वेध भविष्याचा’ या मेळाव्याला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, कार्याध्यक्ष निखिल ठाकरे, माजी जि.प.अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, सिने अभिनेत्री निशिगंधा वाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी जि.प.सभापती तथा नियोजन समितीचे सदस्य नाना नाकाडे, तनुश्री आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम, रिंकू पापळकर, भाऊ गोडसेलवार, युनूस शेख, संजय चरडुके आदी पदाधिकारी मंचावर विराजमान होते.

यावेळी मार्दर्शन करताना ना.धर्मरावबाबा म्हणाले, विकासाला विरोध करणाऱ्यांना कधी साथ देऊ नका. जिल्ह्यात अनेक विकास कामांचा वेग वाढला आहे. रेल्वे गडचिरोलीपर्यंत येत आहे. ती पुढे आलापल्ली, सिरोंचापर्यंत न्यायची आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातील भाग्यश्री आत्राम यांच्या जनसंपर्काचे कौतुक करत या क्षेत्राच्या पुढच्या आमदार त्याच राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष यांनी विदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सर्वाधिक ताकत गडचिरोलीत दिसली असे कौतुक करत सत्तेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. गडचिरोली लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. यावर लवकरच निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

अभिनेत्री निशिगंधा वाढ यांनी स्पर्धा कधीही आजुबाजूच्याशी करू नका, तर स्वत:शी करा, असे सांगत आपल्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जा, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. यावेळी रविंद्र वासेकर, लिलाधर भरडकर यांनीही मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये जोष भरला.

कार्यक्रमाच्या शेवटी अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांना ना.धर्मरावबाबा यांनी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले.