नाव बदलून मूळ जात बदलत नाही, ते हलबा-हलबी नाही तर राजपूत?

डॉ.किरसानबाबत डॅा.कोहाड यांचा दावा

गडचिरोली : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या जातीवर जात-जमातीचे अभ्यासक व संशोधक डॅा.सुशिल कोहाड यांनी आक्षेप घेतला आहे. पूर्वी सूर्यवंशी ठाकूर समाजाचा घटक असणारे हलबा-हलबी कसे, असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

डॉ.नामदेव किरसान हे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव कटंगी येथील रहिवासी आहेत. ते उच्चशिक्षित आहेत यात शंका नाही. परंतु त्यांनी मिळवलेल्या दाखल्यांवरून ते मूळ आदिवासी नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या समाज संघटनेचे नाव सूर्यवंशी ठाकूर समाज असे होते. हा समाज दर्जाने राजपूत होता. परंतू नंतर त्यांनी हलबा-हलबी समाज संघटना असे नाव बदलले. संघटनेचे नाव बदलून समुहाची जात बदलण्यात आली असून 1970 च्या दशकातील आदिवासी विकास विभागातील मोठा घोळ असल्याचा आरोप डॅा.कोहाड यांनी केला.

या राजपूत समुहाने पूर्वी परधान व महार जातीचा विटाळ केला. 1962 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा लढविली होती. त्यांना हरविण्यात राजपुत समुह होता. 1868 मध्ये भंडारा सेटलमेंट रिपोर्टमधील पृष्ठ क्रमांक 70, 71 वर हा समुह गंगा, यमुनाच्या तटीय प्रदेशातून, मंडला येथून राजे भोसल्यांचे सैनिक म्हणून आला. नंतर ते भंडारा येथे शेती करू लागले. म्हणून त्यांना राजपूत वंशातून काढले. महाराष्ट्र सरकारच्या हजारी रिपोर्ट 1965 मध्ये त्यांना ‘हलबी फ्रॅाम राजपूत’ असे म्हटलेले आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागात तत्कालीन शासनाने मोठा घोटाळा करत आदीवासी प्रमाणपत्र दिल्याचे डॅा.कोहाड यांचे म्हणणे आहे.

वास्तविक नामसदृश हल-बाह, हर-वाह असा उल्लेख आर.व्ही.रसेल यांच्या राजपूत व हलबा प्रकरणात सापडतो. चांदा सेटलमेंट रिपोर्टमध्ये अशुद्ध राजपूत असा उल्लेख आहे. राज्य सरकारचे वि.रा.शिंदे यांच्या 2009 मधील पुस्तकात मध्यप्रांतातील अर्धवट राजपूत हाळब असा संदर्भ येतो. हा समूह गेल्या 50 वर्षापासून आदिवासींचे विघटन करून सवलती लाटत असून कोणाचीही लबाडी खपवून घेऊ नये, असे आवाहन डॅा.कोहाड यांनी केले.