बालविकास विभागाच्या पोषक आहार स्टॅालने वेधले सर्वांचे लक्ष

गडचिरोली : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमास्थळाजवळ उभारण्यात आलेल्या शामियान्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॅाल्स लावण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने पोषण आहाराचे महत्व सांगण्यासाठी लावण्यात आलेल्या या स्टॅालमधील विविध प्रकारच्या पोषक पदार्थांच्या स्टॅालने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) अर्चना इंगोले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या बालविकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी या पोषण आहाराच्या स्टॅालसाठी मेहनत घेतली. पोषण आहाराबाबतची माहिती अंगणवाड्यांमार्फत गावागावात पोहोचविली जात असल्यामुळे कुपोषित बालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत असल्याचे यावेळी अर्चना इंगोले यांनी सांगितले.