गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्ती आणि वाघांच्या हल्ल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी गुरूवारी (दि.१९) जिल्हा काँग्रेसच्या वतीने वनसंरक्षक कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. हत्ती आणि वाघांच्या हल्ल्यामुळे धान कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. यातून त्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी वनमंत्री, पालकमंत्री आणि वनविभागाच्या नावे जोरदार नारेबाजी करण्यात आली. नुकसान झालेल्या पिकांसाठी संबंधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, हल्ल्यात मरण पावलेल्या परिवारास आर्थिक मदत द्यावी, नुकसानभरपाईसाठी जाचक अटींमध्ये शिथिलता देण्यात यावी, गडचिरोली वनवृत्तात वन्यजीव विभागाची निर्मिती करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यानंतर वनसंरक्षक रमेशकुमार, वडसा विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. १५ दिवसात दखल न घेतल्यास वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरटी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, युवक काँग्रेसचे अध्यक्ष लॅारेन्स गेडाम, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.