आरमोरीजवळ वाघाने हल्ला करत घेतला शेतात काम करणाऱ्या महिलेचा बळी

शेतातून लगतच्या जंगलात नेले फरफटत

आरमोरी : जिल्ह्यात धान कापणीचा हंगाम सुरू होत असताना श्वापदांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. आरमोरी तालुक्यात रानटी हत्तीनंतर पुन्हा एकदा वाघांचे हल्ले सुरू झाले आहेत. गुरूवारी (दि.१९) काळागोटा येथील रहिवासी असलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ताराबाई एकनाथ धोडरे (57) असे मृत महिलेचे नाव आहे.

आरमोरी शहराजवळच्या रामाळा परिसरातील शेतात धान कापणी करत असताना वाघाने ताराबाईवर हल्ला करून तिला लगतच्या जंगलात फरफटत नेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने तिकडे धाव घेऊन पंचनामा केला.

गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींच्या धुमाकूळाने शेतकरी त्रस्त असताना आता वाघांनी शेताकडे मोर्चा वळविल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.