मका खरेदीसाठी पोर्टल सुरू करा, अन्यथा सातबारावर नोंदणी करा

चामोर्शी बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांची मागणी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जवळपास एक लाख क्विंटल मका उत्पन्न झाले आहे. परंतू मका खरेदीसाठी शासनाने अजूनपर्यंत ई-पीक नोंदणी पोर्टल चालू केले नसल्यामुळे मका पीकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडील मका खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने एकतर ई-पीक नोंदणी सुरू करावी, किंवा शेतकऱ्यांच्या सातबारावर मका नोंदणी करण्याचे आदेश पटवाऱ्यांना द्यावे, अशी मागणी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार, मका खरेदी करण्याकरिता ई-पीक नोंदणी करणे आवश्यक आहे. जर शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी पोर्टलवर झाली नाही, तर आधारभूत किमतीनुसार मक्याची विक्री करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे एकतर मका नोंदणीकरिता ई-पीक नोंदणी सुरू करावी, किंवा पटवाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सातबारावर मका नोंदणी करण्याचे आदेश देण्यात यावे. असे न केल्यास मका खरेदी न करताच शासनाची मका खरेदी नोंदणी पोर्टलची तारीख संपून जाण्याची शक्यता गण्यारपवार यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी ई-पीक पाहणी पोर्टल चालू करण्याचे किंवा पटवाऱ्यांमार्फत तपासणी करून सातबारावर नोंद करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी गण्यारपवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.