चिचडोह बॅरेजमध्ये चार युवकांना जलसमाधी

तिघे चामोर्शीतील तर एक जण गडचिरोलीचा

चामोर्शी : तालुक्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेजच्या पाण्यात बुडून चार युवकांचा मृत्यू झाला. यातील तिघे जण चामोर्शी शहरातील तर एक जण गडचिरोलीचा रहिवासी आहे.

मृतांमध्ये मोनू त्रिलोक शर्मा (२६ वर्ष रा . गडचिरोली, प्रफुल विठ्ठल येलुरे (२० वर्ष), महेश मधुकर घोंगडे (२० वर्ष), शुभम रुपचंद लांजेवार (२४ वर्ष) सर्व राहणार प्रभाग क्र. ४, आशासदन टोली, रा. चामोर्शी यांचा समावेश आहे.

पाच युवक चिचडोह बॅरेजजवळील खोल पाण्यात आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हे युवक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही पाण्यात बुडाले. विशेष म्हणजे ज्या युवकाला वाचविण्यासाठी बाकी युवक खोल पाण्यात गेले तो युवक कसाबसा पोहत काठावर आल्याने त्याचा जीव वाचला. पण उर्वरित चारपैकी एकालाही जिवंत बाहेर काढण्यात यश आले नाही.

ही घटना दुपारी ३.३० ते ४ वाजतादरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे, तुषार पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, परंतू मोटार बोट किवा डोगा उपलब्ध नसल्याने पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने व दोरखंडाच्या सहाय्याने जवळपास एक तास शोधमोहिम राबवुन चारही युवकाचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश मिळवले.