आरमोरी विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसाचा फटका, पिकांचे नुकसान

पंचनामे करण्याचे आ.गजबे यांचे निर्देश

देसाईगंज : सद्यथितीत मक्यासह रबी हंगामातील पिकं काढणीला आली असताना रविवारच्या रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या काही भागातील उभ्या पिकांना फटका बसला. चारही तालुक्यातील तहसीलदारांनी मोका चौकशी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश आमदार कृष्णा गजबे यांनी दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी यथाशिघ्र आपआपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे अर्ज करावे, असेही आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज व कोरची तालुक्यातील काही भागात ११ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. सद्यस्थितीत मका, भाजीपालावर्गीय पिक जोमात आहे. रबी हंगामातील डाळवर्गीय पिकांची काढणी जोमात सुरु आहे. अशात अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता यावी याकरीता मोका चौकशी करून पंचनामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे तहसीलदारांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश आ.गजबे यांनी दिले.