एसआरपीएफ जवानाने स्वत:च्या रायफलने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर घडला थरार

गडचिरोली : गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या एका राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने स्वत:च्या इन्सास या स्वयंचलित रायफलने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. उत्तम श्रीरामे असे त्याचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.

नक्षलविरोधी अभियानासाठी पुण्यातील राज्य राखीव पोलिस बल क्रमांक १ ची एक कंपनी गडचिरोली जिल्ह्यात तैनात आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याची गडचिरोलीत बदली झाल्यानंतर त्याची ड्युटी जिल्हाधिकारी बंगल्यात लागली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगलात एकावेळी चार जवान तैनात असतात. त्यांच्यासाठी असलेल्या बॅरेकमध्ये सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा थरार घडला.

जवानाच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी वैयक्तिक तणावातून हा प्रकार घडला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तविली जात आहे. तो विवाहित होता असेही सांगितले जाते.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुपारी बराच वेळपर्यंत सविस्तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह मूळ गावी रवाना केला जाणार आहे.